पुणेहवेली

ट्रॅक्टर वितरकाची तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी बारामती न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीयकृत बँकेच्या ९ आधिका-यांविरोधात बारामती पोलीसांत गुन्हा दाखल,

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख   

       राष्ट्रीयकृत बँकेच्या विविध पदांवरील पदाधिका-यांनी संगनमत करुन लोणी काळभोर येथील एका ट्रॅक्टर वितरकाची तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी बारामती न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीयकृत बॅन्केच्या ९ आधिका-यांविरोधात बारामती पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनोहर बबनराव खैरे (वय. ४२, मुळ रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली. सध्या भिगवण बारामती रोड, जळोची, बारामती) यांनी बारामती येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. फौजदारी प्रक्रिया संहितेन्वये गुन्हा दाखल करुन तपास करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार बारामती पोलीसांनी यु एम बाजी, अवनीश कुमार, जयकिसन रोडा, चूक साहेब (चौघे रा. एरंडवणे,पुणे), नागेश्वर राव, संदीप माळी, विरेंद्र रावखंडे, अजय गुप्ता (चौघे रा. गुलटेकडी, पुणे) व वैभव पाटील (थेऊर शाखा व्यवस्थापक) या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कदमवाकवस्ती येथील सुर्या ट्रॅक्टर कंपनीने ऑगस्ट २०१५ मध्ये थेऊर फाटा येथील बडोदा बॅन्केतून कर्ज काढले होते. त्यामध्ये फिर्यादी मनोहर खैरे हे फक्त दोन कोटी रूपये कर्जाला जामीनदार आहेत. आणि ५ कोटी रुपये ही बॅन्क गॅरंटी आहे. बडोदा बॅन्केच्या अधिका-यांनी फिर्यादीच्या विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यापैकी काही कागदपत्रे ही कोरी होती. बॅन्केच्या आधिका-यांनी त्यावेळी फिर्यादीला सांगितलं कि बॅन्केने १२ कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. कंपोझीट हायपोथेकेशन करारामध्ये कर्ज हे ७ कोटी रूपयांचे आहे. दोन कोटी रुपये कर्ज समजून फिर्यादीने सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. नंतर सर्व कागदपत्रे पाहिल्यावर बँक ऑफ बडोदाने खोटेपणाकरून पाच कोटी रुपयांची बॅन्क गॅरंटी कर्जाला जोडली. मात्र फिर्यादीने पाच कोटी रुपयांच्या बॅन्क गॅरंटीला कधीही हमी दिली नव्हती. बँक ऑफ बडोदाने सुर्या ट्रक्टर्स कंपनीला फक्त २ कोटी रुपये कर्ज दिले होते. नंतर बॅन्केने पाच कोटी रुपयांच्या बॅन्क गॅरंटीतील चार कोटी दहा लाख रुपये न्यू हाॅलंड ट्रॅक्टर कंपनीला वर्ग केले. बॅन्केने सीएनएच इंडस्ट्रीयल इंडिया प्रा लि यांना पत्र पाठवून हि रक्कम परत पाठवण्याचे निर्देश दिले. परंतू त्या कंपनीने पैसे परत केले नाहीत. आता कर्ज परतफेड करण्यासाठी फिर्यादीकडे बेकायदेशीर आणि फसवणूकीने पैसे मागितले जात आहेत. प्रत्यक्षात बॅन्केने सुर्या ट्रॅक्टर्स कंपनीस केवळ दोन कोटी रुपये कर्ज दिले असताना सात कोटी कर्ज व त्या वरील व्याज असे एकूण १८ कोटी रुपयांची मागणी बॅन्क फिर्यादीकडे करत आहे. ज्या बॅन्क गॅरंटीस फिर्यादी जामिनदार नव्हते, त्या रकमेची बॅन्क मागणी करत आहे. त्यामुळे फिर्यादीने बारामती न्यायालयात तक्रार दाखल केला होता. बारामती पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करत आहेत.