Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून खोके गटात जाणार नाही, योगेश ससाणे यांचा खुलासा… हडपसर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वातावरण ?

हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
शिंदे गटाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक योगेश ससाणे शिंदे गटात जाणार अशा वावड्या उठल्या असताना त्यांनी आज फेसबुक लाईव्ह करून मी कुठल्याही पक्षात जाणार नाही तर राष्ट्रवादीतच राहणार असा खुलासा केल्याने तूर्तास त्यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा थांबल्या आहेत, मात्र एकंदरीत वातावरणावरून हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वकाही आलबेल नसल्याचे वातावरण आगामी महापालिका निवडणुकीत भोवणार आहे.
योगेश ससाणे हे माजी नगरसेवक दत्तात्रय ससाणे यांचे चिरंजीव होत, वडील काँग्रेसमध्ये असताना त्यानंतर योगेश ससाणे यांनी आपली राजकीय कारकीर्द भाजपमध्ये प्रवेश करून सुरू केली परंतु भाजपमध्ये त्यांचं मन न रमल्याने मागच्या पंचवार्षिक महापालिका निवडणूक पूर्वी त्यांनी अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समर्थकांसह प्रवेश केला त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणूक लढवून विक्रमी मतांनी हडपसर मध्ये निवडून आले.
नगरसेवक झाल्यावर महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार आंदोलन करून त्यांनी लक्ष वेधले तसेच हडपसर मधील कचरा प्रकल्पांना विरोध करणारे ते एकमेव नगरसेवक होते बाकी नगरसेवकांनी चुप्पी साधल्याने या आंदोलनात योगेश ससाणे एकटे पडले मात्र त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही किंवा कोणतीही सेटलमेंट केली नाही याचा तोटा त्यांच्या प्रभागाच्या निधीवर झाला त्यांना सत्ताधाऱ्याकडून कोंडीत पकडत अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आक्रमक योगेश ससाणे मागे हटले नाहीत पाच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी स्थायी समिती सदस्य, विरोधी पक्षनेते पद व महापालिकेच्या पदावर दावा केला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांना कोणत्याही पद मिळाले नाही अभ्यासू व आक्रमक असतानाही त्यांना डावलण्यात आले त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.
हडपसर महंमदवाडी येथील शाळेच्या कामानिमित्त त्यांनी पुण्यात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली व काही मागण्या मांडल्या त्यानंतर काही न्यूज पोर्टलवर योगेश ससाणे शिंदे गटात जाणार त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी आगामी निवडणुकीत उमेदवारी मागितली, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आहेत अशा बातम्या छापून आल्या त्यानंतर त्यांच्याशी रोखठोक महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधीने संपर्क साधला असताना मी कोणत्याही गटात जाणार नाही असा खुलासा त्यांनी केला होता.
आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओके आहे खोकेवाल्यांच्या मागे जाणार नाही मी पक्ष सोडणार व दुसऱ्या गटात जाणार ह्या सर्व वावड्या आहेत मला कोणी या संदर्भात विचारलेलं नाही सत्ताधारी नेत्यांकडे कामा संदर्भात आपण जात असतो याचा अर्थ आपण त्या पक्षात प्रवेश करणार असा नाही असा खुलासा करत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला.

हडपसर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही सर्व काही अलबेल नाही…..
हडपसर विधानसभा मतदारसंघात शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून खासदारकीला निवडून आले त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विधानसभेवर निवडून गेले हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असताना मात्र अंतर्गत गटतट व नेत्यांची भाऊगर्दी यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरी व पक्ष बदल मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चिन्हे आहेत, माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी पक्ष सोडणार नाही राष्ट्रवादीतच राहणार असा खुलासा केला असला तरी त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची पाच वर्षात डावलल्याने नाराजी लपून राहिलेले नाही त्यामुळे आगामी काळात ते काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे, तसेच तीनच्या प्रभाग रचनेत बदल करून पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने चारचा प्रभाग केल्याने सर्व इच्छुकांची धाकधूक वाढलेली आहे त्यादृष्टीने अनेक इच्छुकांनी भाजपचे माजी आमदार व ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासोबत बैठका व चर्चा केली सुरू केली आहे, राष्ट्रवादीतून डावलले गेल्यास भाजपमधून उमेदवारी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

विद्यमान आमदारांची नाराजीचा फायदा भाजप घेणार?
हडपसर विधानसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे झाली नसल्याची अनेक पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे, तसेच अनेकांना डावलले गेल्याने अनेक कार्यकर्ते नाराज आहेत त्याचाच फायदा माजी आमदार योगेश टिळेकर घेण्याच्या मार्गावर आहेत विद्यमान आमदार चेतन तुपे ही नाराजी थोपवणार व बंडखोरी होऊ देणार नाही की भाजप हडपसर मधील राष्ट्रवादीच्या बालेकिल्लाला सुरुंग लावणार हे आगामी काळात लवकरच स्पष्ट होईल.

हडपसर विधानसभा मतदारसंघात नागरी प्रश्न जैसे थे…..
हडपसर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामध्ये पथारी पुनर्वसन, भयानक वाहतूक कोंडी पाण्याचा विस्कळीत पुरवठा, हडपसर भाजी मंडई चे पुनर्वसन, अंतर्गत रस्ते, रखडलेला सय्यदनगर, मांजरी रेल्वे उड्डाणपूल असे एक ना अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीआहे त्यातच राज्यात सत्ता बदल झाल्याने आलेला निधी गोठविला गेल्याने अनेक विकास कामे रखडलेली आहेत, आगामी महापालिका निवडणुकीत याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसणार हे मात्र निश्चित आहे.