करिअरपुणे

खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका विजयादशमीनिमित्त महिला व पुरुष संघांनी लुटले सुवर्ण! राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022

अहमदाबाद ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दस-याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद वर्चस्व गाजवत महाराष्ट्राच्या खोखो खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदकाची भेट देऊन विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला.
संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत महिला गटात महाराष्ट्र संघाने ओडिशा संघावर डावाने विजय साकारत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र महिला खोखो संघाने 18-8 असा एक डाव व 10 गुणांनी ओडिशा संघाचा पराभव केला. महाराष्ट्र संघाकडून रुपाली बडे हिने 3 मिनीटे संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका भोपी हिने अष्टपैलू कामगिरी नोंदवली. प्रियांका भोपी हिने 2.50 आणि 3.50 मिनीटे पळतीचा खेळ केला आणि 2 गुण देखील मिळवले. प्रियांका इंगळे हिने 1.50 मिनीटे संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ केला. तसेच तिने 8 गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेश्मा राठोड हिने 2.50 मिनीटे संरक्षण केले. रुपाली बडे हिने 3 मिनीटे पळतीचा खेळ करुन सर्वांचीच वाहवा मिळवली. अपेक्षा सुतार हिने 1.40 मिनीटे संरक्षण केले व दोन गुण देखील मिळवले. संपदा मोरे हिने 1.20 मिनीटे नाबाद संरक्षण केले. ऋतुजा खरे हिने दोन गुण मिळवले. ओडिशाकडून निकिता साहू, शुभाश्री व मागी माझी यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली.

पुरुष गटात महाराष्ट्र संघाने केरळ संघाविरुद्ध आक्रमक खेळत सुवर्णपदक जिंकले. महिला गटाप्रमाणेच महाराष्ट्राचा पुरुष संघ डावाने जिंकतो की काय याची मोठी उत्सुकता होती. मात्र, महाराष्ट्र संघाने केरळचा चुरशीच्या लढतीत सात मिनीटे राखून व 4 गुणांनी (30-26) विजय साकारत गोल्ड पटकावले.
महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी ठरली. अक्षय भांगरे याने 2 मिनीटे व 1.10 मिनीटे संरक्षण केले. रामजी कश्यप याने 1.30 मिनीटे व 2 मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला. ह्रषिकेश मुर्तावडे याने अष्टपैलू कामगिरी बजावली. त्याने 1.40 व 1.30 मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला व 6 गुण मिळवून संघाच्या सोनेरी यशात मोलाचा वाचा उचलला. सुरेश गरगटे याने 1.20 मिनीटे संरक्षण केले व 14 गुण घेऊन संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. प्रतिका वाईकर याने 1.20 मिनीटे पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गावस याने 4 गुण मिळवले. केरळकडून निहाल, श्रीजेश व अभिराम यांनी झुंज दिली.

सुवर्ण भेट ः शीतल भोर
महाराष्ट्रातील तमाम खोखो आणि क्रीडा प्रेमींना विजयादशमीनिमित्त सुवर्ण पदकाची भेट देता आली यापेक्षा दुसरा आनंद नाही. अंतिम सामन्यात ओडिशा संघाला डावाने हरवून सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास होताच आणि प्रत्यक्षात सामना डावाने जिंकून आम्ही गोल्ड जिंकले याचा मोठा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया महिला खोखो संघाची कर्णधार शीतल भोर हिने व्यक्त केली.
शीतल भोर म्हणाली की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपूर्वी खोखो संघाचा 15 दिवसांचे सराव शिबिर घेण्यात आले. या सराव शिबिरात अधिक प्रभावी पद्धतीने सराव करुन घेण्यात आला. तसेच आम्हाला अतिशय चांगल्या सुविधा देण्यात आल्या. संघात दर्जेदार व अनुभवी खेळाडू असल्याने आमचा संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार होताच. संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी आमचे मनोबल वाढवले. या सर्वांचा परिपाक म्हणजेच आम्ही मिळवलेले हे सुवर्णपदक आहे, असे शीतल भोर हिने सांगितले.

सुवर्ण जिंकण्याचेच ध्येय होते ः ह्रषिकेश मुर्तावडे
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आम्ही सुवर्ण पदक जिंकण्याचेच ध्येय घेऊन आलो होतो. सराव शिबिरात आणि या स्पर्धेत आम्ही जे डावपेच आखले होते. त्यानुसार खेळ केला आणि अपेक्षेप्रमाणे गोल्ड जिंकले. संघातील सर्व 15 खेळाडूंचा समन्वय व ताळमेळ अतिशय सुरेख होता. संघात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू असल्याने आमचा संघ विजेतेपदाचा दावेदार होता आणि आम्ही सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत गोल्ड जिंकले याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रशिक्षक शिरीन गोडबोले सरांनी ज्या पद्धतीने आम्ही खेळ करावयाचा हे सांगितले होते. त्यानुसार आमचा स्पर्धेतील खेळ झाला आणि गोल्डवर आम्ही शिक्कामोर्तब केले. विजयादशमीची खोखो आणि महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना आम्ही सुवर्णपदकाची भेट देऊ शकलो यापेक्षा दुसरा आनंद नाही असे ह्रषिकेश मुर्तावडे याने सांगितले.

दोन सुवर्णाची खात्री होती ः गोविंद शर्मा
महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांची स्पर्धेपूर्वीची तयारी आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रत्येक सामन्यात त्यांनी गाजवलेले वर्चस्व पाहता दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील याची मला खात्री होती. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करुन गोल्डन धमाका केला याचा मोठा आनंद आहे. सर्व खेळाडू याचे हकदार आहेत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र खोखो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी व्यक्त केली.

गोल्डन धमाका ः चंद्रजीत जाधव
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत दोन्ही संघ अप्रतिम खेळले आहेत. जवळपास प्रत्येक सामने त्यांनी डावाने वा अधिक फरकांनी जिंकले आहेत. साहजिकच अंतिम सामन्यात दोन्ही संघ गोल्ड जिंकतील याची खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघ अंतिम सामन्यात जबरदस्त खेळले आणि गोल्ड जिंकले अशी प्रतिक्रिया भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे गोल्डन यश ः नामदेव शिरगावकर

खोखो स्पर्धेत महाराष्ट्र संघांनी शानदार कामगिरी नोंदवत दुहेरी सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्रात खोखो खेळाची मोठी परंपरा आहे. या परंपरेला साजेशी अशी कामगिरी आज नोंदवत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दुहेरी सोनेरी यश खूपच आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचा महिला खोखो संघ ः प्रियांका भोपी, प्रियांका इंगळे, ऋतुजा खरे, शीतल भोर, श्वेता वाघ, अपेक्षा सुतार, रेश्मा राठोड, रुपाली बडे, आरती कांबळे, गौरी शिंदे, पूर्वा मडके, जान्हवी पेठे, मयुरी पवार, दीपाली राठोड, संपदा मोरे. कोच – प्रवीण बागल, व्यवस्थापक रत्नराणी कोळी, कोच प्राची वाईकर.

महाराष्ट्राचा पुरुष खोखो संघ ः राहुल मंडल, सागर पोतदार, अविनाश देसाई, मिलिंद कुरपे, अक्षय भांगरे, रामजी कश्यप, ह्रषिकेश मुर्चावडे, सुयश गरगटे, सुरज लांडे, अक्षय मिसाळ, प्रतिक वाईकर, लक्ष्मण गावस, धीरज सेनगर, निहार दुबळे, विजय शिंदे. कोच – शिरीन गोडबोले, संघ व्यवस्थापक कमलाकर कोळी, डॉ. अमित रावटे.