पुणे

“हडपसर विधानसभा मतदारसंघात आगामी काळात राजकीय उलथापालथ होणार का ? “समाजवाद्यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजमध्ये चुरस, शिवसेना – काँग्रेसची भूमिका महत्वपूर्ण”

हडपसर (विशेष बातमीदार)
एक काळी हडपसर मतदारसंघ पूर्वीचा कॅन्टोन्मेंट मध्ये राष्ट्रसेवादलाचे सैनिक कार्यरत होते. त्यामुळे समाजवादी विचार सरणीचा फार मोठा पगडा होता. स्वातंत्र्य सैनिक तथा आमदार रामभाऊ तुपे यांच्या संपर्कात असलेले कार्यकर्ते समाजवाद जपत. यानंतरच्या काळात माजी आमदार शिवरकरांमुळे काँग्रेस पक्षाची एंट्री झाली. व परिसरात काँग्रेस पक्षाची कारकीर्द सुरु झाली. बरेच वर्षे आमदार राहिल्यानंतर 1995 साली स्व.सूर्यकांत लोणकरांच्या माध्यमातून शिवसेनेचा या मतदारसंघात खऱ्या अर्थाने प्रवेश झाला. भाजपच्या आमदारास पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार निवडून आला, पण हडपसर चा इतिहास पाहता पुन्हा संधी कोणाला मिळणार यावर हडपसर मतदारसंघाचे राजकारण अवलंबून आहे.
मागील काळात बाळासाहेब शिवरकर व स्व.विठ्ठलराव तुपे हे दिग्गज रिंगणात उतरले त्यात कालांतराने विठ्ठलराव तुपे पुढे राष्ट्रवादी पक्षातून आमदार व नंतर खासदार झाले होते. येथेच खऱ्या अर्थाने “राष्ट्रवादीचा” मतदारसंघात प्रवेश झाला व पुढे तो बालेकिल्ला या नावाने फोफावला. या कालावधीत स्थानिक पातळीवरील राजकारणात राष्ट्रवादी सक्रीय झाली व राजकारणात नगरसेवक, आमदार, खासदार या निवडणुकीत जम बसवत गेली.
यानंतर परत काँग्रेस पक्ष सक्रीय झाला व महापालिकेत जम बसवत असताना परत या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यात महादेव बाबर यांनी शिवसेनेला उभारी देत आमदारकी खेचून आणली ! हाच चंचू प्रवेश बालेकिल्ला काबीज करण्यात यशस्वी झाला. काही शिवसेनेचे नगरसेवक निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले. तर हडपसरशी निगडीत शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील दोन वेळानिवडून आले होते.
हे होत असतानाच महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. त्यात हडपसर येथील मतदार संघात विधानसभा निवडणुकीत भाजपाचे योगेश टिळेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, मनसे या उमेदवारांचा पराभव करून यशस्वी झाले.
यानंतर हाच मतदार संघ आमदार चेतन तुपेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कडे परत आला तसेच लोकसभेत हडपसरशी निगडीत शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे निवडून आले. यावरून पुन्हा काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे यांच्या तुलनेत राष्ट्रवादीने महापालिकेत बाजी मारली ती आमदार, खासदारच्या माध्यमातून.
आताच्या राजकीय उलथापालथ मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ कोणाकडे वळणावर याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुणे शहरात शिंदे शिवसेनेचे यश कसे व किती मिळणार याकडे सध्या लक्ष वेधले गेले आहे. हडपसरमधून शिंदे सेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरेच्या रुपाने कितपत यश मिळेल यावर सध्या भाष्य करणे योग्य ठरणार नसले तरी शिवसेनेच्या उमेदवारांना शिंदे शिवसेनेचा शह बसू शकतो असे दिसते. त्यात मनसेचे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे नेते कशाप्रकारे राजकीय खेळी करतात यावर बरेच यशापयश अवलंबून आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यात शिवसेनेचा मोठा वाट असताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून सहकार्य होत नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे, त्यातच सत्ता गेल्याने विकासकामात अडथळा येऊ लागला आहे. येथील रखडलेली विकासकामे हा कळीचा मुद्दा असणार आहे.
पुर्वी हडपसर मध्ये जातीपातीचे अर्थात मराठा-माळी तसेच नातेसंबंधचे राजकारण राजकीय बदलास कारणीभुत ठरत असे, बाहेरून अर्थात दुसऱ्या शहरातील व्यक्तीला राजकारणात प्रवेश नाकारले जात असत परंतु आता उपनगरात निरनिराळे उद्योगधंदे, आय.टी.सेक्टर उदयाला आल्यामुळे विविध शहरातील, राज्यातील नोकरदार मंडळी येथे स्थाईक झाल्याने हा प्रभाव कमी झाला आहे. आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकीत बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या मतदारांची भूमिका महत्वाची असणार आहे, या मतदारांना डावलून कोणत्याही पक्षाच्या नेत्यास राजकारण करता येणार नाही हे पण दुर्लक्षित करून चालणार नाही, एकुणच हडपसर आणि पूर्वीचा कॅन्टोन्मेंट मतदारांनी काहीशा फरकाने वेळोवेळी सत्ता बदलात यशस्वी भूमिका बजावली आहे असे दिसून येते, त्याची पुनरावृत्ती होणार का ? ते येणारा काळच ठरवेल असे वाटते !

सुधीर मेथेकर,
पत्रकार, हडपसर
लेखक पूर्वी लोकसत्ता मध्ये लिखाण करत होते.