पुणे

पुण्याच्या पूर्व भागात हडपसर उपनगराची महानगरपालिका होणे काळाची गरज ! पुणे महापालिकेला आता न सोसणारा बोजा !

हडपसर / पुणे (विशेष प्रतिनिधी)
खरंतर पूर्वी पासून हडपसरचे नाव महाराष्ट्राच्या पटावर अधोरेखित झाले ते सामुदायिक सहकारी शेतकरी संघ व हडपसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडई मुळे.
सहकारी तत्वावर सामुदायिक शेती सुरू झाली ती सुभाष सामुदायिक शेतकरी संघाच्या नावाने स्वातंत्र्या नंतर म्हणजे 1948 च्या सुमारास, जी आजही टिकून आहे. त्याच प्रमाणे हडपसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मार्केट ने सुध्दा नावलौकिक कमावला तो शेतकरी ते थेट ग्राहका पर्यंत भाजी विक्री ! याचा मुळ उद्देश असा की शेतकऱ्यांना व ग्राहकांना याचा फायदा व्हावा. यामुळे हडपसर मध्ये आणलेला भाजीपाला थेट मुंबई येथे विक्री साठी जात. आजही हा व्यवसाय मोठ्या दिमाखात चालू आहे, फक्त जागेअभावी तो शेवाळेवाडी येथे स्थलांतरित झाला आहे.
काळानुसार हळूहळू हडपसरची झेप उपनगराच्या दिशेनी होत गेली आणि मगरपट्टा येथील शेतकऱ्यांना एकत्र करून व्यवस्थापकिय संचालक सतिश मगर आणि स्व.खासदार विठ्ठल तुपे यांच्या संकल्पनेतून जगप्रसिद्ध मगरपट्टा टाऊनशिप उभी राहिली. यामुळे परदेशातील व्यावसायिक येथे खास भेट देण्यासाठी येतात. अशा तऱ्हेने हडपसरचा कायापालट होण्यास सुरुवात झाली म्हंटले तर वावगे ठरणार नाही. या मगरपट्टासिटीमुळे शेतकऱ्यांचाच फायदा झाला असे नाही तर मोठमोठे उद्योग धंदे, आयटी सेक्टर, बँका, मॉल, अशा अनेक विविध गोष्टी येथे आल्या त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने हाताला काम मिळाले, रोजीरोटीसाठीची समस्या सुटत आली असे म्हणायला हरकत नसावी.
हे होत असतानाच साडेसतरा नळी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र आणून अमानोरा पार्क ही भव्य दिव्य अशी टाऊनशिप उभारण्यात आली. अनिरुद्ध देशपांडे (व्यवस्थापकीय संचालक) यांनी येथे जागतिक पातळीच्या सोईसुविधा उपलब्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू ठेवले आहेत. अत्याधुनिक सोयी सुविधासह उभारलेल्या या टाऊनशिपमुळे नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांचा घराचा प्रश्न सुटला तसा शेतकऱ्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे व्यवसाय मिळाले, त्यांच्या जमिनीला सोन्याच्या भावापेक्षा जास्त किंमत मिळाली असं म्हंटले तर वावगं ठरू नये ! अत्याधुनिक मॉल, चित्रपटगृह येथे येथे उभारण्यात आली यामुळे घरगुती वापरासाठी लागणारे साहित्य, कपडे, करमणूक सगळं काही एका ठिकाणी उपलब्ध झाल्याने सर्वांना फायदा झाला.
हे सगळं होत असताना मात्र हडपसरचा म्हणावा तसा विकास झाला नाही ही खंत मात्र आजही येथील नागरिकांना आहे. शहराच्या विस्तारिकरणात (पुणे महापालिकेत गावे घेतल्याने) महापालिकेवर भार वाढला याचा परिणाम या भागातील विकास कामावर निश्चितच पडला आहे. महामार्गावर असलेल्या पिंपरी-चिंचवड मध्ये जसा विकास झाला तसा येथे झाला नाही. तेथील विकास होण्याचे मुख्य कारण तेथील विकासात महापालिका व राजकीय नेत्यांचा विकासात्मक दृष्टिकोन आणि प्रभावी इच्छाशक्ती असे बोलले जाते. हडपसर सुध्दा महामार्गावर वसलेले आहे, परंतु येथे झाले नाही. का झाले नाही याचा उहापोह करणार नाही, कारण हे येथील सर्वांना माहीत आहे. तरी राजकीय साठमारी व उदासीनता यास कारणीभूत आहे हे नाकारता येत नाही.
महापालिकेच्या वतीने विकासात्मक कामापेक्षा नको त्या योजना हडपसर येथे उभारल्या आहेत जशा फुरसुंगी उरुळी देवाची येथील कचरा डेपो, रामटेकडी येथील कचरा प्रकल्प, जनावरांचे दवाखाने आदी योजना हडपसरकरांच्या माथी मारल्या. याला काही ठरावीक एक दोन नगरसेवकांनी विरोध दर्शविला परंतु सर्व राजकीय नेते, पुढारी मंडळींनी एकत्र येऊन याला प्रखरपणे विरोध केला नाही. तसा विरोध झाला असता तर या योजना येथे आल्या नसत्या असे वाटते. लोकप्रतिनिधींनी आपल्या पोळ्या भाजून घेतलं अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळते. खरं तर येथील महापालिकेच्या आण्णासाहेब मगर रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, परंतु ते होत नाही. या परिसरात महापालिकेचा अद्ययावत एकही दवाखाना नाही, त्यामुळे गरीबांची आर्थिक परिस्थितीमुळे गैरसोय होते. येथे जागा आहे, फक्त यंत्रणा उभी राहिली पाहिजे.
जो काही विकास झाला तो येथील मोठमोठ्या टाऊनशिप, बांधकाम व्यावसायिक यांच्या मुळे झाला असे हडपसर येथील नागरिकांना वाटते. येथील उड्डाणपूल बांधले तेही गैरसोयीचेच आणि सुमारे पंधरा वर्षातच दुरूस्तीसाठी आले ! म्हणजे जी कामे केली तीही समाधानकारक नाहीत. त्यामुळे हडपसर उपनगराच्या नागरिकांना स्वतंत्र महापालिका हवी आहे. या संदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुतोवाच केल्या प्रमाणे खरंच स्वतंत्र महापालिकेची आवश्यकता आहे. कारण समाविष्ट गावांमुळे क्षेत्र वाढले आहे. पुणे महापालिका हा सगळा भार कसा पेलवणार ? हडपसर उपनगराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महापालिका आवश्यक आहे हे नमूद करावे वाटते.

सुधीर मेथेकर,
हडपसर, पुणे
लेखक हडपसर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत.