गेल्या काही दिवसात पुणे शहरात झालेल्या प्रत्येक पावसात पुणे शहरातील रस्त्यांवर पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये गुडघ्या एवढे पाणी साचले होते. व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी घुसले होते, कित्येक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले तर दुचाकी देखील वाहून गेल्यात. प्रशासनाच्या गैरवस्थापनाचा व नालेसफाईमध्ये हलगर्जीपणा केल्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसला.
या अगोदर पुण्यनगरीने अनेक मोठे- मोठे पावसाळे पाहिले आहेत परंतु त्या काळात दरवर्षी उन्हाळ्यात होणारी नालेसफाई यामुळे हा सर्व पाऊस सामावून घेण्याची या पुण्यनगरीची क्षमता होती. परंतु अलीकडच्या काळातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची किंमत सर्वसामान्य पुणेकरांना मोजावी लागली आहे.
खरे तर पुणे शहरातून उद्भवलेली ही परिस्थिती गेल्या पाच वर्षात नालेसफाई न करता परस्पर बिले लाटल्याने निर्माण झाली आहे.इतिहासात कधीही पुण्यात पाणी जमा झाले नव्हते परंतु या पाच वर्षात आंबील ओढ्याला आलेला पूर, कात्रज तलाव ओव्हर फ्लो होऊन आलेला पूर, यावर्षी तर पुणे शहराच्या मध्यवर्तीतील प्रत्येक रस्त्यावर आलेला पूर ही पाच वर्षांमध्ये झालेल्या अक्ष्यम चुकांची परिणीती आहे. पुणे शहरातील कुठलाही नाला आज साफ झालेला नाही त्यामुळे चोक-अप होणारे हे सर्व पाणी पुण्याचा रस्त्यांवर आले आहे.
पुणेकर व्यावसायिकांचा दुकानांमध्ये, पुणे शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये हे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये न झालेल्या नालेसफाईमुळे झालेल्या या सर्व परिस्थितीबद्दल जबाबदारी स्वीकारून जबाबदारपणे चूक मान्य करण्याऐवजी पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीवर बोट दाखवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला येत्या निवडणुकांमध्ये नागरिक अरसा नक्की दाखवतील, परंतु कुठल्याही कामाचे श्रेय घेण्यासाठी जशी रस्सीखेच करता तशी जर चूक झाल्यानंतर चूक कबूल केली असती तर कदाचित पुणेकरांनी तुम्हाला माफ केले असते. परंतु यावेळी देखील पुणे भाजपमधील राजकारण्यांनी ती परिपक्वता दाखवली नाही.
आज पुणे शहर पाण्याखाली असण्याला गत पाच वर्षातील पुणे महानगरपालिकेची न झालेली नालेसफाई जबाबदार आहे व तसेच या न झालेल्या नालेसफाईच्या पोटी एक हजार कोटींची बिले लाटनारे सत्ताधारी पक्षातील नगरसेवक व त्यांनी पाळलेले ठेकेदार देखील तितकेच जबाबदार आहेत , असा माझा थेट आरोप आहे.
एक कारभारी कोल्हापूरचा तर दुसरा नागपूरचा अशी पुण्याची गत झाली असून या दोघांच्या कार्यक्षमतेवर नागरिक बोट उचलतील या अगोदर त्यांनी पुणे शहरातील गत पाच वर्षातील नालेसफाई च्या कामांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवावे , असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.