पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे );
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य तसेच शहरात पोलीस अधिकारी यांच्या अचानक पणे बदल्या होत आहेत त्यातच काल पुणे शहराचे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी वाहतूक उपायुक्त राहूल श्रीरामे यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. त्यांचा पदभार आर्थिक व सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडे सोपविला आहे. त्याशिवाय वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आणखी ३०० जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळित ठेवावी, चौकाचौकात अमलदारपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नियमनाला प्राधान्य द्या. पीक अवर्समध्ये दंडवसुली करू नये, मध्यवर्ती ठिकाणांसह उपनगरांमध्ये वाहतूकीचे नियोजन करावे, अशा सूचना वरिष्ठांकडून श्रीरामे यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. त्यातच दिवाळीच्या खरेदीसाठी काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा फटका नागरिकांना बसला आहे. त्यामुळे काही राजकीय पक्षांनी निवदेनाद्वारे नाराजी व्यक्त केली होती.
त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आर्थिक व सायबर विभागाच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडे कार्यभार दिला. तर श्रीरामे यांना वाहतूकीचा रोजचा अहवाल नवटके यांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मनुष्यबळाचे देखील कारण दिले जात असल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिरीक्त ३०० नवीन कर्मचारी वाहतूक शाखेला देऊन वाहतूकीचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात रस्त्यांवर तसेच प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस उभा असेल असे सांगितले असून त्यामुळे नेहमी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठा फायदा होईल असे पुणे शहर पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.