पुणे

सदाशिव पेठेत हॉटेलला लागलेल्या आगीत हॉटेल मालकाच्या सहा वर्षीय मुलीचा भाजून दुर्दैवी अंत…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुणे येथील सदाशिव पेठेतील स्काउट ग्राउंड जवळ असलेल्या हैद्राबादी बिर्याणी हॉटेल मध्ये इकरा नईम खान (वय ६, रा. सदाशिव पेठ) असे आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे, हॉटेलचालक नईम खान सकाळी हॉटेलसाठी लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी बाजारात गेले होते. त्यांचा स्वयंपाकी तेथे काम करीत होता. नईम खान यांची पत्नी व तीन मुले हॉटेलच्या पोटमाळ्यावर होते. स्वयंपाकी काम करीत असताना त्याला गॅसचा वास आल्याने त्याने गॅस बंद करून शेगडी पेटवली. त्या वेळी अचानक आगीचा भडका उडाला. खानच्या पत्नी, दोन मुलांना उचलून बाहेर धाव घेतली. मात्र, त्यांची सहा वर्षांची इकरा पोटमाळ्यावरच अडकून पडली. आग भडकल्याने स्थानिकांना तिची सुटका करता येत नव्हती. हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाची दोन वाहने, एक पाण्याचा टँकर व देवदूत वाहन घटनास्थळी दाखल झाले होते,

दाखल होतच जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला, तसेच बीए सूट घालून आतमध्ये प्रवेश करून पाचच मिनिटांत जखमी अवस्थेतील मुलीची सुटका केली, मुलगी गंभीर भाजलेल्या अवस्थेत होती देवदूत वाहनातून तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, उपचारांपूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

तोपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी हॉटेलमधून कोळशाच्या सहा शेगड्या आणि तीन सिलिंडर बाहेर काढून आगीवर नियंत्रण मिळविले, दरम्यान, गॅस गळती होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनास्थळी काही प्रमाणात शॉक लागत असल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, याबाबत पुढील तपास खडक पोलिस करीत आहेत.