हवेली ता.प्रतिनिधी:- अमन शेख.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेला कुप्रसिद्ध गुन्हेगार गजानन उर्फ गज्या मारणे (टोळीप्रमुख) याच्या साथीदाराला मध्यप्रदेश मधील इंदोर येथून मोठ्या शिताफीने पकडले असून गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने धडाकेबाज कामगिरी बजावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन ऊर्फ गज्या मारणे (टोळीप्रमुख) व त्याच्या साथीदारांवर दि. १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा पोलीस तपास करताना गजानन ऊर्फ गज्या मारणे याचा साथीदार डॉ. प्रकाश सताप्पा बांदिवडेकर (रा. चंदगड, कोल्हापूर) याचा गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस डॉ. प्रकाश सताप्पा बांदिवडेकर याचा शोध घेत असताना त्याला चाहुल लागल्यामुळे तो कोल्हापुर येथून पसार झाला होता. म्हणून गेल्या दोन वर्षात गुन्हे शाखा युनिट ६ यांनी युनिट स्थापन झाले पासून केलेल्या साहसी व धडाकेबाज कारवाया लक्षात घेऊन पुणे शहर पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी गुंड गजा मारणे टोळीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी डॉ. प्रकाश बांदिवडेकर याला ताब्यात घेण्याचे आदेश गुन्हे शखा युनिट -६ यांना दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके व त्यांच्या पथकाने अथक परिश्रम करून गोपनीय बामीदारांना सक्रीय करून मध्यप्रदेशातील इंदोर मध्ये जावून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. दाखल गुन्ह्यामध्ये डॉ. बांदिवडेकर याला अटक करण्यात आली असून त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये विविध पोलीस ठाणे अंतर्गत खून, खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. डॉ. बांदिवडेकर याचे मुंबईतील कुख्यात गुंड छोटा राजन याचे टोळी विरुद्ध वैर होते. सदर टोळीयुद्ध मधून झालेल्या बऱ्याच खून प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या बांदिवडेकर याचे नाव व सहभाग असल्याचे नेहमी समोर आले. परंतु त्याच्या दहशतीमुळे बरेच खुनाचे गुन्हे दाखल झाले नाहीत. बांदिवडेकर हा आतापर्यंत ३ ते ४ खुनाच्या गुन्ह्यामध्ये कायदेशीर अटक असून तो सदर प्रकरणात शिक्षा देखील भोगून आला आहे. तपासामध्ये त्याचा गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेणे हे मोठे आव्हान होते. सदर गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश बांदिवडेकर याचे इंदोर, मध्य प्रदेश येथे चांगले प्रस्थ असून त्याचे स्थानिक भागात राजकीय, सामाजिक व्यक्तीमध्ये अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे त्याला ताब्यात घेताना अनेक अडचणी येणार हे टीमला माहिती होते. तरी देखील मागे न हटता टीमने बाहेरील राज्यात जाऊन तेथील अनोळखी परिसरात शिताफीने व चिकाटीने पाळत ठेऊन माहिती मिळवून, आपले बातमीदार सक्रिय करून अखेर पहाटे ०५:०० वाजता चे सुमारास त्यास ताब्यात घेतले. टीमने अत्यंत धाडसी व धडाकेबाज कामगिरी केलेबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस उपनिरिक्षक भैरवनाथ शेळके, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे या टीमचे कौतुक केले आहे.
सदरील कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस उपनिरीक्षक गैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे यांनी केली आहे.