हडपसर येथील श्रीचंद्रमौलेश्वर महादेव मंदिर आणि संत सावता महाराज मंदिर येथे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने परिसरातील हजारो भाविकांनी श्री चंद्रमौलेश्वराचे , कार्तिक स्वामींचे, नवग्रहांचे आणि सावता महाराजांचे दर्शन घेतले. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सरकी कापूर, तीळ व तेल ज्वलन करीत दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात पौर्णिमा साजरी करण्यात आली. हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री नीलेश मगर म्हणाले, मंदिरात सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती.मंदिराच्या कळसाजवळ त्रिपुर पाजळून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर मंदिरात भव्य रांगोळी काढून भाविकांनी त्याभोवती पणत्या लावत त्रिपुर पाजळले.या निमित्ताने अन्नकोटचा महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यामध्ये विविध प्रकारचे ड्रायफ्रूट, फळे, फरसाण, दिवाळी फराळ, मिठाई असा 365 पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. भाग्यश्री बिचुकले, शुभम बिचुकले,कमलेश कासट ,वृषाली कासट, गणेश तुपे यांनी अत्यंत देखणी व सुबक रांगोळी साकारली. श्री चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर आणि सावता महाराज मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याप्रसंगी मगरपट्टा सिटी चे एमडी श्री सतीश मगर,कुमार बिल्डर्सचे श्री राजस जैन, मार्केटयार्ड येथील फळांचे व्यापारी श्री सुयोग झेंडे,ज्येष्ठ उद्योजक श्री दशरथ जाधव आणि आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे पदाधिकारी नीलेश मगर, अविनाश तुपे, रामदास तुपे,नितीन लगड,गणेश फुलारे,प्रदीप शेवकर,संजयकुमार भोसले, सागर जगताप, घनश्याम झंवर, सतीश फोफलिया, रमेश दंडाले, हेमंत भोसले, नितीन लगड, दिलीप गवळी इतर कर्मचारी व सेवेकरी यांनी संयोजन केले.