पुणे

येरवडा मध्यवर्ती काराग्रहात झालेल्या दोन गटातील मारामारीमुळे जेलमध्ये तणावाचे वातावरण , सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर…!

पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

पुणे येथील येरवडा मध्यावर्ती कारागृहामध्ये काल कैद्यांच्या दोन गटामध्ये दगडफेक करून तुफान हाणामारी झाल्याने जेलमधील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,जेलमधील जुने कैदी आणि नवीन कैदी असे दोन गट आहेत आणी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून ही दगडफेक झाल्याचे समजते.

दगडफेक सुरू असताना कैद्यांना सुरक्षारक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला असता कारागृह पोलीस हवालदारांला सुद्धा कैद्यांनी मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे, या मारहाणीत हवालदार हनुमंत मोरे नामक जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बरॅक नंबर २७ ते ३१ जवळ नवीन कैदी व जुने कैदी असे कैद्यांचे दोन गट एकमेकांच्या समोर आले आणी यादरम्यान त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली, त्यानंतर शाब्दिक बाचा बाची चे रूपांतर हाणामारीत झाले त्यानंतर दोन गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली, दगडफेकीचा प्रकार लक्षात येताच तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार हनुमंत मोरे यांनी या कैद्यांना अडविण्याचा प्रयत्न केला.

मात्र मोरे यांनी केलेली मध्यस्थी तेथील कैद्याना न आवडल्यामुळे कैद्यांनी हनुमंत मोरे यांनाच मारहाण करण्यास सुरूवात केली, या मारहाणीत मोरे जखमी झाले आहेत, त्यांना प्राथामिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, या संपूर्ण प्रकारामुळे कारागृहात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, त्यामुळे जेल मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.