हडपसर : पत्नीशी गैरसंबंध असल्याचा समज करून घरा शेजारीच राहणाऱ्या मित्राचा चाकूच्या साह्याने खून करून त्याच्या गुप्तांगाचा भाग कापून परराज्यात पसार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी दिल्ली येथून शिताफीने अटक केले आहे. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अरुण किसन सूर्यवंशी (वय ५४, रा. मांजरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे तर पिताराम केवट (वय २३, रा. मांजरी, मूळ. मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण व पिताराम हे मित्र व एकत्रकाम करीत होते. अरुणचे आपल्या पत्नीसोबत गैरसंबंध आहेत असा समाज करून पिताराम केवट याने अरुणचा काटा काढायचे ठरवले होते. मंगळवार (दि. १५) अरूण व पिताराम एकत्र दारू प्यायले होते. पितारामने घरातला चाकू सोबत घेऊन अरूणला घरामागील मोकळ्या मैदानात नेले. संशयाचे खूळ डोक्यात असलेल्या पितारामने चाकूच्या साह्याने अरूणचा खून करून गुप्तांगही कापून टाकले.
त्यानंतर आपल्या खोलीतील सर्व सामान घेऊन तो फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत असताना तो महाराष्ट्र हद्दीतून पसार झाल्याचे समजले.
हडपसर तपास पथकातील सहाय्यक फौजदार सुशील लोणकर, समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ व निखिल पवार यांना आरोपी दिल्ली येथे असल्याचे खबऱ्यांकडून समजले. तपास पथक दिल्ली येथे गेले असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस नाईक संदीप राठोड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिल्ली येथील तपास पथकाला मार्गदर्शन केले. पोलिसांना गुंगारा देऊन दिल्ली येथे लपून बसलेल्या पिताराम केवट याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास डगळे करीत आहेत
आधी बिहार मग दिल्ली… हडपसर तपास पथकाचे यश
याआधी तब्बल 19 गुन्ह्यात फरार असलेला अट्टल गुन्हेगार बिहारमधून हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतला होता, त्यानंतर या आरोपीस दिल्लीत बेड्या ठोकल्या, हडपसर
पोलिसांच्या तपास पथकाच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.