हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
उरुळी कांचन सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतून घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून फरार असणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर शहर पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. काकाभाऊ बेरा राठोड (वय ५० रा. कुशेगाव ता. दौंड) अरुण विकास नानावत (वय ३१) रा. तामखडा रोड, पाटस ता. दौंड) करण भगत शेखावत (वय २१ रा. तामखडा रोड, पाटस, ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. लोणी काळभोर शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोरतापवाडी (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील उपळवस्ती या ठिकाणी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल पळवून नेला असल्याची तक्रार दिली होती. सदर घटनेच्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक अमित गोरे यांनी तपास पथकातील अंमलदारांना योग्य त्या सूचना देऊन आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना पोलीस हवालदार नितीन गायकवाड यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, पांढरस्थळ वस्ती, उरुळी कांचन या ठिकाणी तीन इसम तोंडाला रुमाल बांधुन आपली ओळख लपवून संशयीतरीत्या फिरत आहेत, व त्यांचेकडे केशरी काळे रंगाची के.टी. एम, मोटारसायकल असुन त्याचेवर कोठेही नंबर नाही अशी माहिती मिळाली. सदरची मिळालेली माहिती वरिष्ठांना सांगून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी थांबले असता खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एक बिना नंबरची एक के. टी. एम, मोटारसायकल वरून तिघेजण पांढरस्थळ येथील कॅनोलचे दिशेने संशयीतरीत्या फिरताना दिसून आले. तेंव्हा त्यांना मोटारसायकल उभा करण्याचा इशारा केला असता त्यांनी त्यांची मोटारसायकल उभा न करता तेथुन निसटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वरील स्टाफचे मदतीने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, ताब्यात घेतल्यावर त्यांना नाव व पत्ता विचरले असता त्यांनी वरीलप्रमाणे नाव व पत्ता सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ऑक्टोबर महीन्यामध्ये सोरतापवाडी परीसरामध्ये चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली असून त्यांच्या कडुन सोन्या-चांदीचे दागीणे जप्त करण्यात आले आहेत. तसेच वरील तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. सदर आरोपी हे पोलीस कस्टडीमध्ये असुन अधिक तपास सुरु आहे, सदरची कामगिरी लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, आनंद पाटोळे, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, नितेश पुंडे, शैलेश कुदळे, दिपक सोनवणे, पोलीस शिपाई बाजीराव वीर, निखील पवार, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.